केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात इफ्कोच्या नॅनो डीएपीचे (द्रवरूप डीएपी) उद्घाटन केले. यानंतर आता शेतकऱ्यांच्या वापरासाठी नॅनो डीएपी उपलब्ध होणार आहे. नॅनो डीएपीच्या वापरामुळे मातीची गुणवत्ता सुधारण्यास आणि उत्पादकता वाढण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांना नॅनो डीएपीची 500 मिलीची बाटली 600 रुपयांना मिळेल, तर पारंपरिक डीएपीच्या एका गोणीची किंमत 1,350 रुपये आहे. म्हणजेच नॅनो डीएपीची किंमत पारंपारिक डीएपी पेक्षा जवळपास निम्मी आहे. त्यामुळे नॅनो डीएपीच्या वापराने शेतकऱ्यांचा खर्च घटणार आहे.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, नॅनो डीएपीमुळे एक गोणी खताचे काम फक्त बाटलीभर खताने होणार आहे. त्यामुळे खताच्या वाहतुकीवरचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. तसेच या खतामुळे सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन मिळेल आणि देश खतांच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यात मदत होईल.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने गेल्या महिन्यातच नॅनो डीएपीला मान्यता दिली होती. नॅनो युरिया आधीच बाजारात उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत नॅनो डीएपी सुरू झाल्याने देशाच्या खतांच्या आयातीत घट होणार आहे. सध्या इफकोच्या कलोल युनिटमध्ये नॅनो खतांची निर्मिती केली जात आहे. येथे दररोज 500 मिलीच्या 2 लाख बाटल्या तयार होत आहेत.

0 टिप्पण्या