नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी शिंदे फडणवीस सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्याच्या घोषणेचा देखील समावेश आहे. या राज्य शासनाच्या योजनेमुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान चे 6000 आणि नमो शेतकरी चे 6000 असे एकूण 12000 रुपये वार्षिक मिळणार आहेत.



मात्र राज्य शासनाने दिलेली ही मदत अतिशय तुटपुंजी असून तेलंगणाच्या धरतीवर राज्यातील शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयाची मदत जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की तेलंगणामध्ये तेथील शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी दहा हजार रुपयाची मदत शासनाच्या माध्यमातून दिली जाते. यामुळे महाराष्ट्रात देखील तेलंगाना प्रमाणेच एकरी दहा हजार रुपयाची दरवर्षी मदत शासनाकडून मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

खरं पाहता राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, ढगाळ हवामान यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट आली आहे. विशेष बाब म्हणजे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचा फटका सहन करत बहु कष्टाने बळीराजा शेतमाल उत्पादित करतो.

परंतु शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाही. शासनाच्या कुचकामी धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसतो. यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकरी हिताचा निर्णय घेतला पाहिजे आणि तेलंगाना सरकारने ज्या पद्धतीने तेथील शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत त्या योजना महाराष्ट्रात लागू केल्या पाहिजेत अशी मागणी जोर धरत आहे. तेलंगणातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी प्रतिएकर दहा हजार रुपये मदत, तसेच शेतीसाठी मोफत वीज व पूर्णवेळ वीजपुरवठा केला जातो.


महाराष्ट्रात देखील तेलंगणा मधील या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शंकरांना धोंडगे यांनी यावेळी केली असून यासाठी लवकरच धोंडगे सरकारकडे मागणी करणार आहेत. यासाठी प्रत्यक्ष सरकारची भेट घेऊन निवेदन दिले जाणार असल्याची माहिती धोंडगे यांनी यावेळी दिली आहे


.